वैजापूर, (प्रतिनिधी): शासकीय गोदामातील मका चोरी प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना गजाआड केले. यात मका चोरी करणारे दोन व मका खरेदी करणारे तीन अशा पाच जणांचा समावेश आहे. जुबेर शौकत शेख (३१), मोनु उर्फ अश्फाक अजहर अली (२१), अजहर मुश्ताक शेख (३१), अल्तमस उमर शेख (३२) व मोसीन मुस्ताक शेख (३२) सर्व रा. कादरी नगर वैजापूर असे आरोपींची नावे आहेत.
शासकीय भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या मक्यापैकी १४४ क्विंटल मका चोरीला गेली होती. या प्रकरणी मका चोरीला गेल्याचा गुन्हा वैजापूर पोलीस ठाण्यात २१ जूनला दाखल केला होता. शासनाच्या पणन मंडळाच्या भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल २४०० रुपये दराने मका खरेदी केला होता. हा ५४५० क्विंटल मका नौगजी बाबा दर्गा परीसरातील शासकीय गोदामात साठवून ठेवला होता.
त्यानंतर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (रेशन) लाभार्थ्यांना त्याचे वितरण करण्यात आले. ५१८५ क्विंटल वितरण रेशन लाभार्थी यांना झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी मक्याचे मोजमाप केले. त्यावेळी संपूर्ण साठ्याची पडताळणी केल्यानंतर गोदामातील १४४ क्विंटल मका कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे हा मका चोरी झाल्याचे अधिकाऱ्यांना समजले.
या प्रकरणी पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रविण काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध मका चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक आर आर जाधव यांनी तपास करून आरोपींना बुधवारी पोलीसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी हे व्यसनी आहेत. त्यांनी जवळपास महिना घरापासून दररोज मका चोरी केली. त्यांना वैजापूर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.













